आज, बारामती शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत कामाचा आढावा घेतला. शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता, बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढवण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. ह्या पाहणी दौऱ्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या व्हिआयटी हॉलमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. कोणतीही तडजोड न करता विकासकामं दर्जेदार झाली पाहिजेत. रस्त्यांचं सुशोभिकरण करणं, सेवा रस्त्यालगत झाडं लावण्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं. सोबतच शासकीय जागांमध्ये असणारे अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या. तसंच अवैध वाळू उपसा व अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.