किनवटचा तरूण नांदेडला आढळला कोरोना पॉझिटिव्ह ;
सिद्धार्थनगर कंटेनमेंट व साठेनगर बफर झोन जाहीर
-सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
किनवट : 8 जुलै पासून नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या येथील तरुणाचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने सिध्दार्थनगर कंटेन्मेंट व साठेनगर, भाजी मार्केट बफर झोन म्हणून जाहीर करीत आहे. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि घराबाहेर पडू नये आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत संचारबंदीचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
येथील सिध्दार्थनगरचा एक तरूण 8 जुलै पासून नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी ( दि. 13 ) रात्री 9 वाजता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उप विभाग किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर अभिनव गोयल ( भ्रा.प्र.से. ) यांनी किनवट नगरपालिका हद्दीतील सिद्धार्थनगर कंटेन्मेंट व साठेनगर, भाजी मार्केट बफर झोन घोषीत केले आहेत . या संपुर्ण परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे . या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही . तसेच येथील दुकाने पुर्णपणे बंद राहतील . तसेच उपरोक्त प्रमाणे घोषीत केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशिलवार धोरण व करावयाच्या उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या असून , त्याबाबत आरोग्य विभागाने सुध्दा प्रमाणित कार्यपध्दती ( SOP ) जाहीर केलेली आहे . त्या अनुषंगाने सदर झोन मध्ये विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने केल आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये पुर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदरचे क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमित करण्यास बंदी असेल , अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला , दवाखाना / मेडीकल यांची आवश्यकता असल्यास पालिका/ आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येईल , कंटेन्मेंट झोन मधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत पुर्ण करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक गठीत केले आहे. रुग्णाचे सहवासित सहा व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच संपर्कातील पाच व्यक्तिंना गृह विलगीकरण केलेले आहे. त्या व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात येईल.संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे उपरोक्त परीसराची संपुर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत.
या रुग्णांवर नांदेडमध्ये औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. 14 ) सकाळीच कंटेन्मेंट झोनची सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी रुग्ण बाधित परिसराला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.