Ticker

6/recent/ticker-posts

*बोबडे सरांचा प्रामाणिकपणा..* काही शिक्षक ज्या तत्वांची, मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करतात. ती मुल्ये स्वतःच्या आचरणात आणतात आणि त्यानुसार जगतातही. आमचे गुरुजी आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी.एम बोबडे सर यांच्या प्रामाणिकतेचा किस्सा आज ऐकायला मिळाला




*बोबडे सरांचा प्रामाणिकपणा..*

  काही शिक्षक ज्या तत्वांची, मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करतात. ती मुल्ये स्वतःच्या आचरणात आणतात आणि त्यानुसार  जगतातही. आमचे गुरुजी आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी.एम बोबडे सर यांच्या प्रामाणिकतेचा किस्सा आज ऐकायला मिळाला. बोबडे सर म्हणजे अतिशय कडक शिस्तीचे. जि.प. हायस्कुल अर्धापूर येथे आम्ही शिकत असताना सरांची आदरयुक्त भिती आम्हाला होती. सर दिसताक्षणी मैदानावर असणारी मुले भराभर वर्गात पळायची.   " ऐ कोण आहे रे तिकडे ! " अशी कडक आवाजात हाक येताच सर्व मुले घाबरून वर्गात चिडीचुप बसत. सरांचा दराराच होता तसा.  होतकरु, अभ्यासू विद्यार्थ्यावर बोबडे सर तेवढाच जीवही लावायचे . उंच सडसडीत बांधा, डोक्यावरील विरळ केसांचा झुपका मानेपर्यंत लोळायचा. सरांचा भूगोलाचा तास म्हटला की बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी मध्यंतरातून पळून जायची. अगदी कडक शिस्त असणाऱ्या बोबडे सरांचा धाक हायस्कुलच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर होता. परंतू आम्हाला सरांची भिती कधी वाटलीच नाही कारण आम्ही सरांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करायचो. सरांनी दिलेला होमवर्क वेळेवर करायचो. सरांनी कडक शिस्त, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा ही मुल्ये आमच्यात बिंबवली आणि स्वतःच्या आयुष्यातही आचरणात आणली. केवळ तत्वांच्या पोकळ गप्पा करायच्या आणि आचरण मात्र शून्य अशी कथनी आणि करणी भिन्न असणारी माणसे आपल्या सभोवती भरपूर आढळतात. परंतू बोबडे सर " मात्र बोले तैसा चाले. "
  बोबडे सरांनी जी जीवनमूल्ये आम्हा विद्यार्थ्यांमध्ये बिंबवली ती वास्तवात जगले सुद्धा आणि आजही त्या मूल्यांवरील श्रद्धा वयाच्या पंच्याहत्तरीतही कायम आहे. आजचीच घटना घ्या, अर्धापूरच्या मराठवाडा ग्रामीण बँकेत बोबडे सर आणि त्यांचा पुतण्या आशिष पैसे काढण्यासाठी गेले. सरांनी पैसे काढण्याची पावती (विड्रोल स्लीप ) आशिषकडे भरून देऊन नंबर येण्याची प्रतिक्षा करत होते. सरांना २५ हजाराची आवश्यकता होती त्याप्रमाणे त्यांनी स्लीप वर रक्कम नोंदवली आणि स्लीप आशिषकडे सुुपुर्द केली. पैसे मिळाल्यानंतर सवयीप्रमाणे सरांनी रकमेची मोजदाद केली. तर चक्क ५० हजाराचे बंडल कॅशियरने चुकून दिले होते. सरांच्या अपेक्षित रकमेपेक्षा २५ हजार जास्तीचे आले होते. सरांनी थेट मॅनेजरची कॅबिन गाठून त्यांना सदर बाब लक्षात आणून दिली. अधिकचे आलेले २५ हजार कॅशियर मॅडमना बोलावून परत केले. कॅशियर मॅडमना गहिवरून आले. सरांमुळे त्यांची चुक लक्षात आली होती व २५ हजाराचे नुकसान टळले होते.  त्यांनी सरांचे आभार मानले. " आपल्याला कोणाचे फुकटचे नको बिचाऱ्यांचा तळतळाट लागेल " बोबडे सरांचा हा प्रामाणिकपणा पाहून बँकेत उपस्थित सर्वानी सरांचे कौतूक केले. आम्हाला अभिमान आहे, आम्ही बोबडे सरांचे विद्यार्थी असल्याचा.
पोरं जोमात ,गुरुजी कोमात. मास्तर म्हणजे लई चेंगट, कामचुकार अशा अनेक प्रकारे समाजात शिक्षकांची हेटाळणी केली जाते. शिक्षकांवर अनेक विनोद व्हाटसप तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरत असतात. शिक्षकांच्या प्रामाणिकपणावर विनोद करणारांसाठी सरांची आजची कृती सणसणीत चपराकच होती.
  - प्रा.आत्माराम राजेगोरे