Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाची वाढती साखळी तोडायची असेल तर नागरिकांना शिस्त लावावी लागेल-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, भाप्रसे


कोरोनाची वाढती साखळी तोडायची असेल तर नागरिकांना शिस्त लावावी लागेल
-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, भाप्रसे
 
किनवट / तालुका प्रतिनिधी : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. मास्क न वापरणाऱ्यास, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यास व थुंकणाऱ्यास दंड लावावा. नागरिकांना शिस्त लावावी, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी  कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे,यांनी केले.
              कोरोना ' ब्रेक द चैन ' च्या अनुषंगाने तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची सहविचार सभा आपल्या निवासस्थानी सकाळी आठ वाजता घेतली, यावेळी आढावा घेतांना ते बोलत होते. सभेस तहसिलदार उत्तम कागणे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, पोलिस निरीक्षक मारुती थोरात, तालुका मिडिया समन्वय अधिकारी उत्तम कानिंदे उपस्थित होते. 
              प्रारंभी गट शिक्षणाधिकारी महामुने यांनी कमळपुष्पांनी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण व तहसिलदार उत्तम कागणे यांचे कमळ पुष्पांनी स्वागत केले. पुढे ते असे म्हणाले की, नगर पालिका क्षेत्रात जनजागृती वाढवावी. बॅनर द्वारे शासन व आरोग्य विभागाचे नियम दर्शनी भागात पसरवावे. प्रत्येक दुकानासमोर मास्क शिवाय सामान मिळणार नाही असे सूचनाफलक लावावे. किनवट मोठं शहर नाही. मुख्याधिकारी व नगरपालिकेने कंट्रोल करावे. दोन आठवडे आपण सतर्क राहू नंतर आपणास सोपे जाईल.
              कंटेन्मेंट झोन कडक ठेवावे. तेथील सूचना फलकावर कंट्रोल रूम व पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक द्यावा, उलंघन केल्याचे दृष्टीस पडताच जनतेंनी या क्रमांकावर कळवावे .
              डीसीएचसी व सीसीसी करिता आवश्यक एमबीबीस, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, एमबीए झालेला व्यवस्थापक, नर्सिंग स्टॉफ त्वरीत भरती करावा. तसेच आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान नविन बांधकाम अथवा दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत त्वरीत सादर करावा. अशा महत्वपूर्ण सूचना आरोग्य विभागाला केल्या.

किनवट उप विभागात एकही गरोदर माता वा बालमृत्यू होऊ नये

शासनाच्या वतीने गरोदर मातांसाठी सर्व सुविधा पुरवल्या जातात, अमृतआहार, आरोग्य सुविधा मग अकाली प्रसुती वा नवजात शिशूंचा मृत्यू कसा होतो ?. याकरिता बालविकास व आरोग्य विभाग यांनी सर्व नोंदी अद्यावत ठेवाव्या. लाभार्थींची वेळेच्या वेळी आरोग्य तपासणी करावी व वैद्यकीय सुविधा द्याव्या. याकामी काही कमतरता असेल तर सांगा प्रिंसीपल सेक्रेटरींकडून पूर्तता करून घेऊ या. परंतु किनवट उप विभागात एकही गरोदर माता वा बालमृत्यू होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.
         गरज पडली तर चेकपोस्ट वर पोलिसांसोबत तलाठी नेमा बाहेरून येणारांच्या नोंदी ठेवा. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करा. शहरी भागात नगरपालिकेचे पथक वाढवून सतर्क रहावे. तर ग्रामीण भागात गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक गावचे सरपंच, ग्रामसेवक व करोना समिती यांची बैठक घेऊन प्रत्येक गावं दक्ष करावीत. मास्क न वापरणारा कडून दंड वसूल करावा. शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.
         सभेच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत ओबरे व कर्णेवार मामा यांनी परिश्रम घेतले.