Ticker

6/recent/ticker-posts

"माझे कुटूंब, माझी जबाबदारी" मोहिमेत आजपर्यंत तपासणीसाठी संदर्भित केलेल्या १८५ पैकी आढळले ४५ बाधित ;पथकाने केली आमदार केरामांची तपासणी


"माझे कुटूंब, माझी जबाबदारी" मोहिमेत आजपर्यंत तपासणीसाठी संदर्भित केलेल्या १८५ पैकी आढळले ४५ बाधित ;
पथकाने केली आमदार केरामांची तपासणी

किनवट / तालुका प्रतिनिधी : "माझे कुटुंब माझी जबाबदारी-कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमे" अंतर्गत तालुक्यातील कुटूंब सर्वेक्षणांतर्गत आजपर्यंत १८५ व्यक्तींना तपासणीसाठी संदर्भित केले होते, त्यातील ४५ रुग्ण बाधित आढळले आहेत.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दिली.
             सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात "माझे कुटुंब माझी जबाबदारी-कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमे" चा शुभारंभ किनवट शहरातून आमदार भीमराव केराम यांचे हस्ते करण्यात आला. किनवट शहर व गोकुं द्यात सुमारे १० हजार कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
             
आमदार भीमराव केरामांची तपासणी

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या नेतृत्वात गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, नागरी दवाखाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार नेम्माणीवार व डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांच्या सल्ल्याने मारोती मुलकेवार, प्रवीण गिते व संजय देठे यांच्या पथकाने राजेंद्रनगर येथील आमदार केराम यांच्या ' राजगृह' निवासस्थानी कुटूंबातील सर्व सदस्यांची तपासणी केली. त्यावेळी आमदार महोदय घरी नव्हते. ते घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या ' लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात ' आहेत. असा संदेश मिळाल्यानंतर तिथे जाऊन पथकाने आमदार भीमराव केराम यांची तपासणी केली. यावेळी त्यांचे सोशल मिडिया प्रमुख मारोती भरकड व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम मुंडे उपस्थित होते.
              तालुक्याची एकूण लोकसंख्या २४७०७२ असून सर्वेक्षण करण्यासाठी २७१ पथकांची नियुक्ती केली आहे. आजरोजी पर्यंत १७०७५२ लोकसंख्येचे व
एकूण ३६६२४ कुटूंबाचे सर्वेक्षण केले आहे .  यामधून आजपर्यंत १८५ व्यक्तींना पुढील 
तपासणीसाठी संदर्भित केले होते. कोविड केअर सेंटर येथे तपासणी केलेल्या १८५ व्यक्तींपैकी ४५ रुग्ण बाधित आढळले आहेत.

फोटो कॅप्शन : किनवट : माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आमदार भीमराव केराम यांची तपासणी करताना नियुक्त आरोग्य पथकातील सदस्य मारोती मुलकेवार, प्रवीण गिते व संजय देठे