Ticker

6/recent/ticker-posts

हतबल झालेल्या शेतकऱ्यांना बँक व तत्सम अधिकाऱ्यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभ व नवीन कर्ज त्वरीत द्यावे-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार


हतबल झालेल्या शेतकऱ्यांना बँक व तत्सम अधिकाऱ्यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभ व नवीन कर्ज त्वरीत द्यावे
-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भ्राप्रसे )

किनवट /तालुका प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भावात खालावलेल्या आर्थिक परिस्थितीने व बेहिशोबी पावसाच्या ओल्या दुष्काळाने हतबल झालेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना  कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावयास न लावता बँकेच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी त्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, कर्जमुक्तीचा लाभ व नवीन कर्ज त्वरीत द्यावे, अशा सूचना सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एज. पुजार (भाप्रसे ) यांनी बँक व तत्सम अधिकाऱ्यांना दिल्या.
             येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व नवीन कर्ज वाटप संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी किनवटचे तहसिलदार उत्तम कागणे, माहूरचे तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर आणि किनवट व माहूर तालुक्यातील महसूल, सहकार विभाग व सर्व बँकांचे शाखाधिकारी उपस्थित होते.
             पुढे बोलतांना सहायक जिल्हाधिकारी श्री पुजार म्हणाले, प्रत्येक तहसिल कार्यालयात शेतकरी कर्जाच्या अनुषंगाने एक मदत केंद्र स्थापन करावे. तिथे दररोज सकाळी 11 ते 2 या वेळेत महसूल व सहकार विभागाचा एकेक अधिकारी उपस्थित ठेवावा. त्यांनी तिथे आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना व नवीन कर्जासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. आपल्या सर्व बँक शाखा ह्या ग्रामीण क्षेत्रात आहेत, तेव्हा ग्रामीण भागातून पायपीट करत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या अर्जातील कागदपत्रांच्या अनुषंगाने त्रुटीची लेखी माहिती द्यावी, अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत, त्याकरिता त्यांना इतरत्र भटकंती करायला भाग पाडू नये, तसेच बँकेतील अधिकारी व इतर सर्व कर्मचारी यांनी त्यांचेशी आपुलकीने वागावे, प्रेमाने बोलावे, शक्य तेवढ्या लवकर त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्जमंजुरी प्रकरणाची टक्केवारी वाढवावी.
             बैठकीच्या यशस्वीतेसाठी के.डी. कांबळे, व्ही. टी. सूर्यवंशी, विजय सुरोशे, के. टी. पटणे आदिंनी परिश्रम घेतले.