Ticker

6/recent/ticker-posts

बँकांची उदासीनता आणि पिककर्जासाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली थेट अर्थमंत्र्यांची भेट


बँकांची उदासीनता आणि पिककर्जासाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली थेट अर्थमंत्र्यांची भेट
-----------------------------------------------------
किनवट/माहूर : हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज आणि मतदार संघातील बँकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत खासदार हेमंत पाटील यांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन बँकांची कार्यप्रणाली व मनुष्यबळ आणि  पिककर्जाचा टक्का  तात्काळ  वाढविण्यात येऊन  निपटारा करावा अशी मागणी केली.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतांना सरकारी यंत्रणा सुद्धा शेतकऱ्यांचे हाल करण्यात कमतरता ठेवत नाही, हिंगोली लोकसभा मतदारसंघात ११ तालुक्यात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकामधून लाखो शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप  हंगामासाठी   पिककर्जाची मागणी केली आहे परंतु केवळ ३० टक्केच  शेतकऱ्यांना आजवर मतदारसंघात कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकांमधील मनुष्यबळाची कमतरता आणि अनेक कारणे सांगून पिककर्जासाठी टाळाटाळ करण्यात येते त्यामुळे मतदार संघातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा(ना), वसमत, हदगाव, हिमायतनगर, किनवट,माहूर,आणि उमरखेड, महागाव या तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या  शाखांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली. यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीपासून पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सुरवातीला पेरणी उत्तम होऊन पीक जोमदार आले परंतु नंतर मात्र पावसाचा जोर वाढल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले,  आता सुद्धा परतीच्या मान्सूनमुळे ढगफुटी होऊन पाऊस पडत असल्याने शेतकरी पुरता खचला आहे.स्टेट बँक ऑफ हैद्राबाद चे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण केल्यामुळे अनेक शाखा बंद झाल्या आहेत त्यामुळे उर्वरित राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखावर जास्तीचा ताण पडत आहे परिणामी बँकाकडे  वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर दिले जात नाही ,कामात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर  आणि अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.सद्यस्थितीत मतदार संघात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा,महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत परंतु मनुष्यबळाच्या अभावी पीककर्ज आणि इतर कामे होण्यास विलंब लागत आहे ही बाब खासदार हेमंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शेतकरी हित लक्षात घेता तात्काळ माझ्या मागणीची दखल घेऊन कार्यप्रणाली सुधारून शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्यास संबंधितांना  निर्देश द्यावेत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.