मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले - खासदार हेमंत पाटील ; संसदेत घुमला आवाज
छत्रपती संभाजी राजेंना दिला पाठिंबा
------------------------------------------
किनवट/माहूर : " महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले,खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा " अश्या शब्दात मराठा साम्राज्याचा इतिहास आणि महिमा प्रतित करून खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपला आवाज संसदेत बुलंद करीत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला सोबतच छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांनी आरक्षणप्रश्नी पुढाकार घ्यावा याकरिता पाठिंब्याचे पत्र दिले.
दोनच दिवसांपूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ससंदेत चर्चेला जावा याकरिता संसद नियम ३७७ अंतर्गत संसदेच्या पटलावर ठेवला होता त्यावर आज आपले मत मांडण्यासाठी खासदार हेमंत पाटील बोलत होते.ते म्हणाले की, प्राचीन काळापासून आपण इतिहास पहिला तर जेव्हा -जेव्हा देशावर संकट आले तेव्हा -तेव्हा मराठा साम्राज्याने सामना करून परकीय आक्रमण परतवून लावले आहेत.आणि मराठ्यांचा पानिपतचा जाज्वल्य इतिहास सर्व जगभर परिचित आहेच.सव्वा लाख मराठ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून दिल्ली चे तख्त वाचविले होते.मराठ्यांच्या इतिहासाचा पाढा वाचताना वेळ अपुरा पडेल,परंतु आज त्याच मराठा समाजावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.काळाच्या ओघात एकेकाळी वैभवसंपन्न असलेला समाज मागास होत गेला परिणामी आर्थिक,सामाजिक, आणि शैक्षणिक परिस्थिती खालावत गेली. मराठा समाजाचा आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी खरी गरज निर्माण झाली ती आरक्षणाची!मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तसा १९८० च्या दशकापासून ऐरणीवर आहे.आजवर मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली परंतु सन २००८ पासून या प्रश्नाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले .महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या सरकारने सन २०१८ मध्ये मराठा समाजाला कायद्याच्या माध्यमातून आरक्षण दिले ज्याला सर्वोच न्यायालयाने वैध घोषित केले.पुढे हि लढाई कायदेशीर पणे चालू असताना अनेकांनी न्यायालयात स्थगितीसाठी प्रस्ताव टाकले त्यामुळे न्यायालयीन सुनावणीला खूप मोठा कालावधी लागला आजवर न्यायालयात चार वेळा सुनावणी करण्यात आली आहे . परंतु ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाजाच्या आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि कोर्टाने आदेश दिला की, सन २०२०-२१ मध्ये भरती प्रक्रियेत मराठा समाजाला नौकरीमध्ये आणि सोबतच पुढील शैक्षणिक वर्षात हे आरक्षण लागू होणार नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जावा यासाठी संसदेच्या कलम ३७७ अंतर्गत लोकसभेच्या पटलावर हा प्रश्न ठेवला त्यानुसार आज(दि. 22 रोजी) या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संसदेने खासदार हेमंत पाटील यांना आपले मत मांडण्याची संधी दिली .यामध्ये खासदार हेमंत पाटीलांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मराठा समाजातील लोकांवर अन्याय होईल अशी भूमिका घेतली तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजवर अनेकांनी खूप मोठा लढा उभारून संघर्ष केला आहे. बऱ्याच वर्षांच्या संघर्ष आणि आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षणाचा अधिकार मिळाला आहे, आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली असती परंतु ९ सप्टेंबरच्या निर्णयामुळे सर्वच गोष्टीला विराम मिळाला आहे, त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचे रक्षण केले पाहिजे आणि यावर्षी लागू केलेली बंदी हटविण्यासाठी निर्णायक पावले उचलली पाहिजेत सोबतच खासदार हेमंत पाटील यांनी छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन त्यांनी आरक्षणप्रश्नी पुढाकार घ्यावा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र देऊन या लढाईत आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे आश्वासन दिले. खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ससंदेत उपस्थित करून लोक,आणि समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नावर आपले मत व्यक्त करून आवाज बुलंद केल्याबद्दल मतदारसंघातून आभार व्यक्त केले जात आहेत.