Ticker

6/recent/ticker-posts

शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणा व समाजाचा सहभाग वाढवावा-प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर



शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणा व समाजाचा सहभाग वाढवावा
-प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर

किनवट /तालुका प्रतिनिधी : कोविड-19 मुळे सद्यस्थितीत ज्या ठिकाणी स्थलांतरित कुटुंब व बालकांचे वास्तव्य आहे तेथील शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन शिक्षण प्रवाहात अखंडित ठेवावे, शाळाबाह्य मुले होऊ नये याकरिता सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यातून मोठे प्रयत्न करावे लागतील आणि शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि समाजाचा सहभाग वाढवावा, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर यांनी केले.
                जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग,जि.प. नांदेड आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट तालुक्यातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडीताई, मुख्याध्यापक, शिक्षक, बालरक्षक यांचेसाठी "बालरक्षक आणि बाल हक्क संरक्षण " या विषयावर ऑनलाईन संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
                यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम, जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल हे मार्गदर्शक ऑनलाईन उपस्थित होते.
                किनवट तालुक्यातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालक शाळाबाह्य राहू नये आणि सर्व बालकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे याकरिता लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे  तालुका संपर्क अधिकारी तथा डायटचे अधिव्याख्याता अभय परिहार यांनी प्रास्ताविकातून विशद केले.
                कार्यशाळेत उपस्थित असलेल्या सरपंचांनी शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याकरिता गृहभेटी सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. अंगणवाडीताई सुनिता मुंडे, सुनीता आडे, अनिता मेश्राम, व पयवेक्षिका श्यामल पांडागळे यांनी आजची कार्यशाळा पुढील कामकाजासाठी दिशादर्शक, ज्ञानात भर टाकणारी व स्मृतीवर चढलेली धूळ झटकण्यासाठीची असून चांगले मार्गदर्शन मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
                 केंद्र प्रमुख नागनाथ पांचाळ, पारधी, सुरेश पाटील, संजय कांबळे, अनिल कांबळे, बी. आर. इंदूरवार, संतोष सुर्यवंशी यांनी आपापल्या स्तरावर शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे प्रवेशित केले याच्या सक्सेस स्टोरीचे सादरीकरण केले. 
                 या कार्यशाळेस तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्राचे विषय साधन व्यक्ती, विशेष विषय तज्ञ यासह 477 जणांची ऑनलाईन उपस्थिती होती. डायट, नांदेडचे आयटी विषय सहाय्यक संतोष केंद्रे यांनी तांत्रिक सहाय्य केले व आभार मानले.