माहूर:- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला २१ वर्षीय आरोपी माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देत
पळ काढल्याची घटना आज दिनांक २५ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
शौचालयात पाणी नसल्याने नैसर्गिक विधीसाठी पोलिसांनी त्याला कोठडी बाहेर काढले असता त्याने पळ काढल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.
माहूर तालुक्यातील अनमाळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण रामराव खूपसे(२१) विरूद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून
भादवी च्या कलम ३६३,३६६(अ) ,३७६(अ),(न)पोस्को कायद्या प्रमाणे मागील तीन महिन्या पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके हे करीत होते, तेव्हा पासून आरोपी फरार होता.
आरोपीला काल दिनांक २४ रोजी सहा वाजता माहूर पोलीसानी अनमाळ येथून अटक केली होती.
आज बुधवार रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार होते,त्या पूर्वीच आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
या वेळी ठाणे अमालादार गंगाधर कपाटे,रवी कोंडावार कर्तव्यावर हजर होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला असून
पसार झालेल्या आरोपी विरूद्ध कलम २२४ प्रमाणे आणखी एक गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेतली
असून लवकरच दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.