मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद
-न्यायाधीश जहांगीर पठाण
किनवट / तालुका प्रतिनिधी: मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे.
ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते.
मुलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकांना व्यक्तिमत्वाचा योग्य आणि
मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मुलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते. असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे तालुका विधी सेवा समिती व उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने " जागतिक मानवी हक्क दिना निमित्त "
आयोजित जनजागृती कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव, आमदार भीमराव केराम व उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
पुढे बोलतांना न्यायाधीश पठाण म्हणाले की, "मानवी हक्क हे संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत
. काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता ,
उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य ,
आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी हॅबीअस कॉर्पस् ( Habeas Corpas ) या सारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशामध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. "
अभिवक्ता संघाचे सचिव अॅड.डी.जी काळे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी आभार मानले.
प्रमुख अतिथी सह दिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, " जगातील मानवी हक्काचे उद्गाते तथागत गौतम बुद्ध आहेत.
त्यांनी मनुष्यांसह प्राण्यांच्या हक्कासाठीसुद्धा पंचशील व अष्टांगिक मार्ग सांगितला.
या बुद्धांच्या विचारासह क्रांतीसूर्य जोतीराव फुले व सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कांची तरतूद संविधानात केली.
जन्मतःच किंबहुना जन्मापूर्वी पासून तर मरणानंतरचे सुद्धा मुलभूत अधिकार संविधानाने आपणास प्रदान केले आहेत. "
आपल्या मनोगतात उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक म्हणाले, " स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये मानवी
हक्कांची जाणीव निर्माण करणे व त्यांच्यात संविधानिक तत्त्वांची रूजवणूक करण्यासाठी अशा कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. "
आमदार भीमराव केराम आपले विचार मांडतांना म्हणाले, " आम्ही जन्मापासूनच आमच्या हक्कासाठी झगडतोय. परंतु बाराव्या शतकापासून जागतिक स्तरावर सुरु झालेला
मानवी हक्कांचा टप्पा भारतीय संविधानापर्यंत आला आहे. घटनेतून मिळालेल्या अधिकारातूनच प्रत्येक नागरिक आज सजग झालेला आहे. "
स्पर्धा परिक्षार्थी अक्षय राठोड व वनपरिक्षेत्राधिकारी विनायक खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले,
किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कॉ. गंगारेड्डी बैनमवार, प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, पवार स्वामी,
उद्धव रामतिर्थकर, अॅड. सुनिल येरेकार आदि मान्यवरांसह पाटील अकॅडमी, राजपथ व व्हिजन
अकॅडमीचे बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक शारीरिक अंतर ठेऊन उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राजाराम वाघमारे, प्रा. डॉ.सुनिल व्यवहारे,
प्रा. डॉ. पंजाब शेरे, उपप्राचार्य सुभाष राऊत, प्रा. पंडीत घुले, पर्यवेक्षक किशोर डांगे,
अंबादास जुनगुरे, प्रमोद मुनेश्वर व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.