मुलांना त्यांच्या मनासारख्या कृतीयुक्त बाबी दिल्या तर ते रंजकपणे शिकतील
-उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक
किनवट मुलांना त्यांच्या मनासारख्या कृतीयुक्त बाबी दिल्या तर ते रंजकपणे शिकतील व आदर्श जीवन जगतील
असे प्रतिपादन किनवटचे उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी केले.
तालुक्यातील अतिदूर्गम आदिवासी नखातेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत "शालोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात" मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, व शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष नखाते अध्यक्षस्थानी होते. तर उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक,
गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. डॉ. पंजाब शेरे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे, कोसमेटचे केंद्रप्रमुख मदन नायके आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रारंभी जननायक बिरसा मुंडा व संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. 26/11 च्या अतेरिकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना एक मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक व मुख्याध्यापक विश्वनाथ आडे यांनी सूत्रसंचालन केले.
केंद्रप्रमुख शंकर वारकड यांनी आभार मानले. सुनिता भिसे,रेणुका भिसे यांनी स्वागत गीत व आशा मिरासे हिने राष्ट्रभक्ती गीत सादर केले.
प्रा.डॉ. पंजाबराव शेरे यांनी आपला जीवनपट उलगडून सांगत मुलांमध्ये आवड, जिद्द, अभ्यासू वृत्ती असली पाहिजे असे प्रतिपादीत केले.
त्यानंतर गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने म्हणाले की,
विद्यार्थ्यांनो अभ्यास केल्याने तुम्ही सुद्धा या स्टेजपर्यंत पोहचू शकता, मंचावरील मान्यवरांच्या हस्ते तुमचा सत्कार होऊ शकतो.
मुलांसाठी असा कार्यक्रम ठेवणारे उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे खाकी वर्दीतील समाजसेवकच आहेत.
सबका साथ, छात्रोंका विकास हे श्लोगन घेऊन आपल्या किनवट तालुक्यातून भविष्यात 100 आय.ए.एस. अधिकारी घडविण्याचे व्हिजन आम्ही ठेवले आहे.
यावेळी मार्गदर्शन करतांना उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक म्हणाले की, पोलीसांना घाबरू नका,
ते तुमचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांना आता आम्ही पोलीसदादा, पोलीसकाका केले असल्याचे सांगितले,
जेणेकरून तुमच्या मनातली भिती पळून जाईल.
आपले मुल काय करते याकडे लक्ष ठेवा असे त्यांनी पालकांना सांगितले.
तद्नंतर त्यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागेवर जाऊन शैक्षणिक साहित्य कीटचे वाटप केले.
श्री नाईक यांनी प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थ्यांना साहित्य कीटमधील गोष्टींचे पुस्तक काढून वाचण्यासाठी सांगितले.
सह शिक्षक आनंद पवळे, यशवंत बिऱ्हाडे, पाटील व बीट जमादार एस.जी. निवळे यांचेसह किनवट व ईस्लापूरचे पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.