Ticker

    Loading......

आदिवासी लेकरांचं भावी आयुष्य घडविण्यासाठी " मिशन नीट 2021" हा अत्यंत चांगला अनुकरणीय उपक्रम-पालकमंत्री अशोक चव्हाण


आदिवासी लेकरांचं भावी आयुष्य घडविण्यासाठी " मिशन नीट 2021" हा अत्यंत चांगला अनुकरणीय उपक्रम
-पालकमंत्री अशोक चव्हाण 

किनवट : डोंगरी, दुर्गम भागातील आदिवासी लेकरांचं भावी आयुष्य घडविण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मदतीचा हात देणारा " मिशन नीट 2021" हा अत्यंत चांगला उपक्रम आयोजिला आहे. 

याचं राज्यात इतरांनी अनुकरण करावं. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, अभ्यासात सातत्य ठेऊन नीट उत्तीर्ण व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
    

      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेत 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या 325 आदिवासी मुलांकरिता आयोजिलेल्या 

"मिशन नीट 2021" उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथून ऑनलाईन उद्घाटन करतांना ते बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अप्पर आयुक्त विनोद पाटील, 

जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, मोहन हंबर्डे, आरसीसीचे प्रा. डॉ. मोटेगावकर ऑनलाईन उपस्थित होते. 

पुढे बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, किनवट या डोंगरी भागातून नांदेडला क्लासला येणे शक्य नाही.

 तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेण्याची उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. हा राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले, हा उपक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी आहे. 

आपण कठोर मेहनत घेऊन अभ्यास करून डॉक्टर- इंजिनियर व्हावे. 

यावेळी आपल्या मनोगतात प्रा. डॉ. मोटेगावकर म्हणाले की, शिक्षणामुळे कीर्तिकिरण पुजार साहेबांसारख्यांच्या जीवनात लख्ख-लख्ख प्रकाश आला आहे.

 म्हणूनच त्यांनी आपणासारख्या  दुर्गम भागातील आदिवासी लेकरांना देशातील सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

हा देशातील एकमेव नाविण्यपूर्ण असा उपक्रम आहे.

 तुम्ही आय.ए .एस. अधिकाऱ्याच्या संपर्कात आहात. नीट -जेईई ची तयारी फक्त शहरातच होते, 

असे नाही तर किनवट सारख्या आदिवासी क्षेत्रासाठी एवढा चांगला प्लेटफॉर्म निर्माण करून दिला आहे. 

याचा पुरेपूर लाभ घेऊन कठोर मेहनत आणि नियमित अभ्यास करून आपण यशाचा मार्ग गाठावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. 

याप्रसंगी दिव्या पोटे या विद्यार्थिनीने  मनोगत व्यक्त केले.
          

           या उपक्रमाचे संकल्पक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी प्रास्ताविक केले 

व सर्वांचे आभार मानले. अमोल मेटे यांनी सूत्रसंचालन केले. 

सहायक प्रकल्प अधिकारी(शिक्षण ) मनोज टिळे यांच्या नेतृत्वात मुख्याध्यापक नागनाथ कराड,

 श्याम मुंडे, गृहपाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.