बाधितांच्या वाढत्या संख्येची पाच गावे " ब्रेक द चैन " करिता कंटेनमेंट झोन जाहीर
-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार
किनवट : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता " ब्रेक द चैन "करिता तालुक्यातील पाच गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये
आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केलेल्या
ब्रेक द चैन मधील बाबींचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले.
होमक्वांरंटाईनच्या नावावर बाधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बेपिकीर फिरत आहेत,
त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना बाधित निघत असल्याचे निदर्शनास आले असल्याने
उपविभाग किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर कीर्तिकिरण एच. पुजार (भ्रा.प्र.से.) यांनी कोल्हारी,
इस्लापूर, निचपूर, गोकुंदाव बोधडी ( बु ) या ग्रामपंचायत हद्दीस कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केले आहे.
या संपुर्ण परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे.
या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही. तसेच येथील दुकाने पुर्णपणे बंद राहतील.
तसेच उपरोक्त प्रमाणे घोषीत केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशिलवार धोरण व करावयाच्या उपाययोजना
वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या असून, त्याबाबत आरोग्य विभागाने सुध्दा प्रमाणित कार्यपध्दती ( SOP ) जाहीर केलेली आहे.
त्या अनुषंगाने सदर झोन मध्ये विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने केल आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये पुर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदरचे क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमित करण्यास बंदी असेल,
अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला, दवाखाना /
मेडीकल यांची आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत / आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येईल,
कंटेन्मेंट झोन मधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत पुर्ण करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक गठीत केले आहे.
सदर क्षेत्राच्या चेक पोस्ट प्रवेश व निर्गमन ठिकाणावर आरोग्य विभागातील पथकाव्दारे तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणु ( कोव्हीड-१९ ) लागन रुग्णाचे संपर्कात आलेल्या सहवासित व्यक्तींचा तात्काळ शोध घेणे आणि वैद्यकीय पथकाने निर्देशाप्रमाणे गृह विलगीकरणासह,
संस्थात्मक विलगीकरण करुन इतर वैद्यकीय कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्यांना गृह विलगीकरण केलेले आहे त्या व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात यावा.
संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे उपरोक्त परीसराची संपुर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत.
या गावातील रुग्णांवर वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकामार्फत उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथील डेडिकेटेड कोविड
हेल्थ केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य: स्थितीत स्थिर आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये
आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे.
तसेच सर्व जनतेने उपजिल्हा रुग्णालय, नागरी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र,
उप केंद्र व शहरातील स्थापित केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे असे सहायक जिल्हाधिकारी श्री पुजार यांनी सांगितले.
सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने,
उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात,
सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे.
हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.