Ticker

6/recent/ticker-posts

तहसिलदार उत्तम कागणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन केला कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार


तहसिलदार उत्तम कागणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन केला कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार

किनवट : एकीकडे कोरोना प्रादुर्भावाच्या भितीने  जग हादरून गेलं आहे. जिव्हाळ्याची माणसं एकमेकापासनं दुर झालीत. 

अशात कोरोना बाधित रुग्णाचं निधन झालं तर अंत्यसंस्कार करायचे कुणी ? कसे ? असे प्रश्न ग्रामीण भागात पडू लागलेत.

 परंतु यावर मात करत इन्सिडेंट कमांडर तथा तहसिलदार यांनी पुढाकार घेऊन  स्वतः उपस्थित राहून अशाच एका बाधित रुग्णाचा अंत्यसंस्कार केला. 

याच मातीतला असल्याने याच मातीशी नाळ जुळलेली असल्याचं त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. 
   

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत वरचेवर वाढ होऊ लागली.

 त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार 

यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सिडेंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे यांनी  गफारखान नेत्र रुग्णालय, 

मांडवी व तहसिलच्या जुन्या जागेवरील नव्या इमारतीत पुनःश्च कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु आहेच. 

या तिन्हीही सेंटरवर भर्ती होणाऱ्या बाधितांची संख्या वाढत आहे. 

ते बरे होऊन सुखरूप घरी परतत आहेत. येथे तालुक्यातील आतापर्यंत सात जणांना जीव गमवावा लागला.

 किनवट येथील मृतांवर नगरपालिकेचं पथक अंत्यसंस्कार करतं. 

प्रारंभी घाबरणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सहा जणांवर अंत्यसंस्कार केलेत. 

गोकुंद्यातील एक बाधित निवर्तला, त्यांची दोन्हीही मुलं बाधित, ते वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेताहेत, 

आता अंत्यसंस्कार करायचे कुणी ? असा प्रश्न पडला.
     

  इन्सिडेंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे यांनी गोकुंदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अशोक चव्हाण यांना आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या टीमला पूर्वतयारी करावयास सांगितले. 

वेळ सकाळी साडेदहाची, त्या टीमने तयारी केली. 

मृतदेह न्यायचा कसा ? संदेश मिळताच शेख सलाम शेख अब्दुल्ला हे सामाजिक संस्थेची एम्बुलंस घेऊन आले.

 ते स्वतः दोन कार्यकर्ते किटमध्ये गुंडालेलं प्रेत घेऊन पैनगंगातिरी आले. फक्त पाच नातेवाईक विशिष्ट अंतर राखून हजर होते. 

 किट घातलेल्या कर्मचाऱ्यांनी पुढील सर्व सोपस्कार आटोपला. ज्यांचं बालपण, तरूणपण, संपूर्ण जीवन ज्या पैनगंगातिरी गेलं, त्याच तिरी त्यांचा अंत्यविधी झाला.
       
  यावेळी इन्सिडेंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे, नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, ग्रामविकास अधिकारी अशोक चव्हाण,

 तालुका मिडिया समन्वय अधिकारी उत्तम कानिंदे, 

उत्तम भरणे, शंकर तामगाडगे, कोंडिबा कानिंदे, 
आत्माराम घुले, रवि भालेराव आदिंची उपस्थिती होती. 

आपल्या जिवाची पर्वा न करता प्रत्येक 
कोविड सेंटरला रात्री -बेरात्री आकस्मिक भेटी देऊन वैद्यकीय सेवेसह ईतर सोयी सुविधांची पाहणी करणारे तहसिलदार उत्तम कागणे या कोरोना योध्यांनी बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी 

पुढाकार घेऊन यामातीशी आपली नाळ अजुनही जुळून असल्याची प्रचिती दिल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.