Ticker

6/recent/ticker-posts

श्रवणकुमार राठोडच्या जाण्यानं .नदीम-श्रवण जोडीतला श्रवण कोविडमुळे गेला लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी- आनंदजी यांचा वावर कमी होत असताना ९०च्या दशकांत आनंद-मिलिंद, जतिन-ललित आणि नदीम-श्रवण यांनी 'आम्हाला' आवडतील अशी गाणी दिली


श्रवणकुमार राठोडच्या जाण्यानं .....

नदीम-श्रवण जोडीतला श्रवण कोविडमुळे गेला...
 '90s kids' अर्थात नव्वदच्या दशकात पौंगंडावस्थेत आलेली, ती ओलांडलेली किंवा तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढीचं एक सांस्कृतिक वेगळेपण आहे. या पिढीनं खूप चांगलं आणि प्रयोगशील एकत्रित अनुभवलंय. रेडिओ, टीव्ही आणि केबल टीव्ही च्या स्थित्यंतरात बॉलिवूडचे अनेक नवनवे संगीतकार आमच्या पिढीनं पाहिले, ऐकले, अनुभवले आणि त्यांच्या गण्यांवर मनापासून प्रेम केलं ! टेपरेकॉर्डरची A साईड, B साईड घासून घासून पुन्हा वाजवत तर कधी ब्लॅंक कॅसेटवर 'भरून घेतलेली' गाणी ऐकत आम्ही या ९०च्या बॉलीवूड गण्यांवर प्रेम केलं ! नदीम-श्रवण त्यात जास्त फेवरीट !
लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी- आनंदजी यांचा वावर कमी होत असताना ९०च्या दशकांत आनंद-मिलिंद, जतिन-ललित आणि नदीम-श्रवण यांनी 'आम्हाला' आवडतील अशी गाणी दिली. 

जतिन-ललीत कमाल होते पण नदीम-श्रवणचा बाज वेगळा होता... ९०च्या बॉलिवूड मध्ये या जोडीनं 'मेलडी' आणली ! आशिकी च्या तुफान यशाआधी ही जोडी जवळ जवळ १५ वर्षं संघर्ष करत होती !!  असं म्हणतात की टी-सिरीजनं आशिकी हा फक्त गाण्यांचा अल्बम केला होता. पण जेव्हा गुलशन कुमार यांनी ही गाणी महेश भट यांना ऐकवली तेव्हा त्यांनी या गण्यांवर सिनेमा बनवायचं ठरवलं ! सिनेमासाठी गाणी बनवली जातात, पण गाण्यांसाठी सिनेमा बनवला गेल्याच्या अशा किती कथा असतील माहीत नाही !! 
आशिकीच्या टायटल सॉंग मधली सुरुवातीला वाजणारी गिटार, साजन च्या टायटल सॉंग मधलं 'साजन की आंखों मे प्यार'.... नंतर वाजणारं संगीत, 'दिल है की मानता नही' च्या टायटल सॉंगचं इंटरल्युड, 'दिवाना' मधल्या पायलिया गाण्यातील डफली, 'बरसात' मधल्या 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' या गाण्यातली शिट्टी... या गाण्यांचा हा उल्लेख मी या साठीच केला कारण मला कल्पना आहे, की या ट्युन्स लगेच तुमच्या कानात वाजायला लागल्या असतील... रीकॉल व्हॅल्यू... हीच जादू आहे नदीम श्रवणच्या संगीताची ! 

एक प्रयोग या जोडीनं काही वेळा केला - एकाच गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन बनवण्याचा ! म्हणजे 'साजन' मध्ये 'जिये तो जिये कैसे' हे गाणं कुमार सानू, पंकज उधास आणि एस पी बालसुब्रह्मण्यम अशा तीन आवाजात वेगवेगळं गाऊन घेतलं आणि ही तिन्ही व्हर्जनस सुपर हिट झाली ! असाच प्रयोग त्यांनी 'धडकन' मध्ये केला . 'दिल ने ये कहा है दिल से' गाण्यात केला ... सोनू निगम-अल्का याज्ञीक यांच्या आवाजात एक आणि उदित नारायण आणि अल्का याज्ञीक यांच्या आवाजात दुसरं ! दोन्ही गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली ! 
धडकन हा त्यांचा तसा एका अर्थाने कमबॅक सिनेमा होता. 

कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्या हत्येत नदीम सैफीचं नाव आलं आणि तो लंडन ला पसार झाला ! तिकडेच सेटल झाला. २००२ मध्ये सेशन कोर्टानं नदीम सहित (१९ पैकी) १८ जणांना निर्दोष मुक्त केलं. पण पुढे ही नेहमी नदीमच्या अंडरवर्ल्ड शी असलेल्या संबंधांबाबत चर्चा होत राहिली. 

या वादग्रस्त काळात नदीम श्रवणनं आधी लॉंग डिस्टन्स एकत्र काम केलं आणि मग ही जोडी औपचारिकरित्या फुटली ! आपल्या मागे मेलडीची लेगसी ठेवत तिथंच खरं म्हणायचं तर या जोडीच्या कामाचा शेवट झाला !  आज श्रवणच्या मृत्यूनंतर फक्त टेक्निकल पूर्णविरामच लागला आहे ! 

फार थोर असं काही त्यांचं काम आहे , असं मी अजिबात म्हणणार नाही !! पण माझ्या सारख्या अनेकांच्या नाजूक वयाच्या वळणावर त्यांच्या गाण्यांनी भुरळ घातली ! ती जादू आजही कायम आहे ! आजही कार चालवताना जी गाणी मी रोज ऐकतो, त्या ९० च्या 16 GB पेन ड्राइव्हमध्ये त्यांचा वाटा मोठा आहे ! 

आमच्या पिढीच्या प्रेमाचा, प्रेमभंगाचा, आकांक्षांचा, स्वप्नांचा सांगीतिक पट त्यांनी त्याकाळी बहारदार केला होता ! म्हणून श्रवणचं जाणं मनाला चटका लावून जाणारं आहे !! 

- कमलेश सुतार