प्रकोप थोपविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, प्रत्येकांनी सजग होऊन कोरोनाचा लढा लोकचळवळ म्हणून लढावा
-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार
किनवट : पूर्वीसारखी कोरोनाची मनात भिती राहिली नसल्याने लोकं बेफिकीर वागत आहेत,
त्यामुळे बाधितांची संख्या वाढून परिस्थिती वाईट होत आहे.
प्रशासन सर्व उपाययोजना करीत आहेत,
परंतु हे थोपविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, प्रत्येकांनी सजग होऊन कोरोनाचा लढा लोकचळवळ म्हणून लढावा,
असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार,भाप्रसे यांनी केले.
रविवार (दि.4 ) रोजी सकाळी 11 वाजता येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकारी, कर्मचारी,
लोकप्रतिनिधी, पत्रकार यांची कोविड-19च्या अनुषंगाने घेतलेल्या सहविचार सभेत ते बोलत होते.
यावेळी तहसिलदार उत्तम कागणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, डॉ.अशोक बेलखोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.उत्तम धुमाळे, तालुका अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. गायकवाड,
उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्माणीवार, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, श्रीनिवास नेम्माणीवार, पत्रकार शकील बडगुजर यांनी आपले विचार मांडले.
पुढे बोलतांना श्री पुजार म्हणाले की, उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर व तहसिलच्या नुतन इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू आहे.
वाढती बाधित संख्या लक्षात घेता आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहात नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून व्हेंटिलेटरच नव्हे तर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय.
तालुक्यात उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
सोमवारपासून नगरपालिका क्षेत्रात चार ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात येत आहे. ती वार्डनिहाय करण्यात येणार आहे.
दरदिवशी एक हजार जणांचे लसीकरण होईल. सर्कल निहाय मोठ्या गावात एँटिजेन तपासणी पथक तैनात केले आहेत.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, साबणाने स्वच्छ हात धुवावे, शारीरिक अंतर ठेवावे,
या त्रिसूत्रीचा वापर करावा, माझी जबाबदारी म्हणून आपण व आपले कुटूंब सुरक्षित ठेवावे,
असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले