*शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळणार कृषि विभागाकडून.*
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक.
*ऑनलाईन वृत्तसेवा नांदेड:-
(बालाजी सिलमवार)*
दि. 9 : शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शिर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग,
उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी
https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे
बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर
संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची
नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.
आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात.
तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास
helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा,
असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.