मदरस्यातील मुलांना पुस्तके-शालेय साहित्य वाटप व न्यायाधीशांना निरोप कार्यक्रम उत्साहात संपन्न
किनवट :मदरसा मिफ्ताउल उलूम गोकुंदा येथील विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके, शालेय साहित्य वाटप,
कोरोना जनजागृती व सह दिवाणी न्यायाधीशांना निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशन किनवटच्या वतीने गोकुंदा येथील ईदगाह मैदान परिसरातील मदरसा मिफ्ताउल उलूम येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान सरदारखान हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार (भाप्रसे ),
निरोपमूर्ती सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण व न्यायाधीश जे.एन.जाधव, पोलीस निरीक्षक मारोती थोरात मंचावर उपस्थित होते.
शाळाबंद आहेत परंतु शिक्षण सुरु राहावं, मुलांना आपले छंद जोपासता यावे, यासाठी साहित्यवाटप,
कोरोना पासून घ्यावयाच्या खबरदारीची जागरुकता यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं
असल्याचं उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी प्रास्ताविकामधून सांगितलं.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केलं. मौलाना शरफोद्दीन यांनी आभार मानले.
यावेळी बोलतांना सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार (भाप्रसे ) म्हणाले की,
ज्ञान मिळविण्याची सतत प्रक्रिया सुरु राहण्यासाठी व उत्तम माणूस बनण्यासाठी सुसंस्कार देणारी पुस्तके वाचने अत्यावश्यक आहे.
यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी तालुक्याच्या
अतिदूर्गम आदिवासी गावात तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शालेय साहित्य वाटप करीत आहेत, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
या माध्यमातून पोलिस जनतेचा मित्र आहे हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.
सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण निरोपाला उत्तर देतांना म्हणाले की, येथील सर्व
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने आम्हाला निरोप देण्यात आला त्याबद्दल धन्यवाद ! या परिसरात आम्ही रमलो होतो.
संविधान दिन, मानवी हक्क दिन व विधी साक्षरता असे अनेक उपक्रम येथे राबविता आले, याचा मनस्वी आनंद आहे.
मदरस्यातील मुलांना याप्रसंगी एकच संदेश देऊ इच्छितो, मुलांनो पुस्तकासोबतच माणसं वाचायला शिका, जगरहाटी वाचायला शिका.
न्यायाधीश जे.एन.जाधव म्हणाले की, कोरोनाच्या या भयावह स्थितीत चार भिंतीच्या आतच राहून वाचन, लेखन, मनन, छंद जोपासण्याची आपणास संधी मिळाली आहे.
आपलं भावी जीवन उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. हा परिसर मनाला भावून गेला.
म्हणूनच आम्ही बदली झाली तरी कालावधी वाढवून घेतला होता.
आम्हाला दिलेल्या निरोपाबद्दल सर्वांचे मनस्वी आभार !
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साजीदखान, डॉ. उस्मान, कॉ. गंगारेड्डी बैनमवार, पत्रकार शकील बडगुजर, हाजी हबीब चव्हाण , अल्लाबक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.