Ticker

6/recent/ticker-posts

गौतम बुद्धाचे तत्वज्ञान हे माणूसकेंद्रीत -डॉ. यशवंत मनोहर



गौतम बुद्धाचे तत्वज्ञान हे माणूसकेंद्रीत 
-डॉ. यशवंत मनोहर



बुद्ध जयंतीनिमित्त आॅनलाईन व्याख्यानमालेचा समारोप ; देशभरातील विविध ठिकाणाहून दर्शकांचा भरभरून प्रतिसाद

किनवट : बुद्धाने जगाला माणूसहिताय, माणूससुखाय तत्वज्ञान दिले.  ईश्वर हे जगातलं परम असत्य आहे.

 ईश्वर वगैरे सर्व माणसांनीच निर्माण केले असून काळाच्या ओघात हा सर्व फाफटपसारा माणसावरच उलटला. माणसापेक्षा कुणीच मोठं नाही. 

माणसाला जे दुय्यम मानतं. ईश्वराश्रित मानतं ते तत्वज्ञान मानवीहिताचं नाही. 

बुद्धाचा विरोध कोणत्याही माणसाला नव्हता तर बुद्धाचा विरोध विकृत डोक्यातल्या तत्वज्ञानाला, असत्याला, अज्ञानाला होता. 

बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं, चिंतनाचं केंद्र माणूस आहे. म्हणूनच गौतम बुद्धाचं तत्वज्ञान माणूसकेंद्रीत आहे असे प्रतिपादन नागपूर येथील प्रख्यात आंबेडकरी लेखक तथा विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

 अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आॅनलाईन पद्धतीने आयोजित व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 
       

     यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, व्याख्यानमालेतील सहभागी व्याख्याते

 डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो तसेच संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आणि  डॉ. जे.टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     २५६५ व्या बुद्ध जयंतीनिमित्त अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने  आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. 

बुद्ध जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.  

या प्रसंगी पुढे बोलताना डॉ. मनोहर म्हणाले की, बुद्ध हा जगातील पहिला शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी सत्याला शोधून काढलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दाच्या धम्माची पुनर्रचना केली आणि जगमान्य झाले. 

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्माची पुनर्रचना वैज्ञानिक सत्यावर आधारित केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आता बुद्धासारखे विश्वमय होत आहेत. 

बुद्ध हा जगाचा पहिला तत्वज्ञानी आहे. बुद्ध तत्वज्ञान हे जगाच्या पाठीवरचं पहिलं इहवादी , समतेचं , न्यायाचं , बंधुतेचं तत्वज्ञान आहे.  प्रतित्य समुत्पाद हा बुद्ध तत्वज्ञानाचा पाया आहे. 

बुद्ध कल्पनाविलासी नव्हता तर वास्तववादी होता. मानवी जीवनात उत्कट असा समतोल निर्माण झाला पाहिजे हे धम्माचं ब्रिद आहे.  

बुद्ध तत्वज्ञान हे माणसाला सुंदर करणारं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान समतेचं, बंधुत्वाचं, स्वातंत्र्याचं तत्वज्ञान आहे.

मनोहर म्हणाले की, चि द् वा दा ची नैतिकता ही नैतिकताच नसते.
माणसांनी इश्वराशी कसं वागावं ही नैतिकता नव्हे. ती निरर्थकता आहे. 


तर माणसांनी माणसांशी कसं वागावं हीच खरी नैतिकता आहे. भौतिकवादाला नैतिकवाद व नैतिकवादाला भौतिकवाद करणारं हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे.


चैतन्यवादी तत्वज्ञानातील फोलपणा बुद्धाने अधोरेखित केला. बुद्धाचं तत्वज्ञान निरीश्वरवादी आहे. 


इहवादी आहे.  पूजाअर्चा, जपजाप्य, यज्ञयाग आणि  ईश्वर विषयक कर्मकांडाशी  बुध्दाने सांगितलेल्या धम्माचा काडीचाही संबध नाही. 


जे चैतन्यवादी असतात ते मूलतत्त्ववादी असतात. जात , धर्म , वर्ण , प्रदेश यांच्या चौकटी निखंदून स्वतः:सह सर्वहिताय मूल्यांकडे आपण अग्रेषित झालो पाहिजे. स्वत:चं सतत स्थित्यंतर हे मानवी जीवनाचं गतीशास्त्र आहे. 


 बुद्धांचे तत्वज्ञान हे इहवादी सत्याचा शोध घेणारे आहे.सत्याचा शाेध घेताे ताे सत्यशाेधक. त्यानुसार बुध्दाचं तत्वज्ञान हे अंतीम सत्याचा शाेध घेणारे आहे.

आपण जे शोधलं ते नवं तत्वज्ञान परंपरेच्या जोखडाखाली जगणारे लोक स्विकारतील काय? बुद्धाच्या मनात 'विषाद'दाटून आला. लोकांना सांगू की नको असा प्रश्न बुद्धासही पडला. 


पण हे सर्वसमान्यांच्या हिताचं तत्वज्ञान लोकांना सांगितलंच पाहिजे, या निष्कर्षाप्रत पोहोचून बुद्धाने जगाचा उद्धार केला असे डाॅ. मनोहर म्हणाले. 

व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे,  सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे , संजय डोंगरे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले. 



चौकट....१

नव्या पिढीला विचार करु द्या!


 बुद्धा कडे आपला प्रवास हा बाबासाहेबांच्या बुद्धीच्या पायवाटेने केला पाहिजे. इतकी शाश्वत बुध्दी दुसरी नाही. पुढच्या पिढ्यांना त्यांचा विचार करू द्या. 

त्यांच्यावर जुन्या पिढीनं आपले निकष लादू नये. अन्यथा पुढच्या पिढ्या मेलेल्या निपजतील. हे वैचारिक स्वातंत्र्य आहे. बुद्धाचा धम्म हा स्वातंत्र्य देणारा धम्म आहे. 

बुद्धाचा धम्म मानवी प्रज्ञेला तेजस्विता प्रदान करतो. तो विवेकाचा जागर होय.जे ज्ञानाला थांबवतात ते ज्ञानाचे शत्रू असतात. ज्ञानानं प्रवाहीच असलं पाहिजे. 


ज्ञानानं कुठं थांबू नये. बुद्ध कुठे थांबत नाहीत. सत्य थांबलं की ते मूलतत्ववादी होतं. सत्याला थांबवणारे सत्याचे शत्रू असतात.

 मालुंक्यपुत्त सुत्ताची यथार्थ अन्वर्थकता समजून घेतली पाहिजे. वायफळ , निरर्थक प्रश्नांत गुंगवून किंवा गुंतवून ठेवलं नाही. 

मानवी जीवनाच्या उपयोगाच्या नाहीत त्यांचा विचार करू नका. मानवी जीवनाचं गतीशास्त्र समजून घ्या. अधिकाधिक उन्नयनशील माणूस कसे व्हाल ते बघा.


बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्याने बुद्धाकडे आपण जाऊ या, असा सल्ला डॉ. मनोहर यांनी दिला. 


चौकट.....२



बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची पुनर्रचना केली.


बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला चि द् वा दा शी , अध्यात्माशी , अभौतिकवादाशी , श्रद्धांशी , भक्तीशी अजिबात जोडू नका. बुद्धाचे तत्वज्ञान फक्त इहवादाशी जोडता येते.‌

सर्व प्रकारच्या शाेषणाच्या,विषमतेच्या,अज्ञान व अंधंश्रध्देच्या विराेधात बुध्द उभे आहेत. 

बाबासाहेबांनी केलेली ही धम्मपुनर्चना देशोदेशीच्या बौद्धधर्मीयांना आवडली का ?त्यांच्या धार्मिक संकल्पनेत बाबासाहेबांचा पुनर्रचित धम्म मावणारा नव्हता. बाबासाहेबांनी दिलेला धम्म पुनर्रचना मांडणारा आहे.

 तो लवचिकता व कालानुगत बदल स्वीकारार्ह मानतो. सत्यापर्यंत पोहचणे हाच बुद्धीमतेचा विकास आहे. 

पुनर्रचनेतून धम्म हा बाबासाहेबांचा शोध अाहे. बुद्धीमत्ता अधिक सक्षम व्हावी. या क्षमतेचा गौरव करणारं धम्माचं तत्वज्ञान आहे. 

बुद्धाने अंतसमयी आनंदाला सांगितलं की मी धम्म झालो आहे. मी जातो याचा शोक करू नका. नवं चिंतन करा .

 परिस्थितीशी सांधा जोडत चिंतन करा . नवे व्हा. बदलत्या काळासोबत धम्म अन्वर्थक करीत जा.

 मानवी जीवनाची ही अन्वर्थकता आहे. या अनुषंगानेच बाबासाहेबांनी धम्माची पुनर्रचना केली, असे डॉ. यशवंत मनोहर म्हणाले.