कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी कोविड -19 विषाणूचा शिरकाव न झालेल्या गावात 100 टक्के लसीकरण करावे
-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
किनवट : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर वेगवेगळ्या क्लृप्त्या, उपाय,
संकल्पना राबवून कोविड -19 विषाणूचा शिरकाव न झालेल्या तालुक्यातील 77 गावासह शून्यावर असलेल्या
23 पाडे-तांड्यात 100 टक्के लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कोविड-19 लसीकरण आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार,
प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. कार्तिकेयन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले,
तहसिलदार अनिता कोलगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पुढे म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलं बाधित होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मोठ्या माणसांना बोलता येतं ते सांगू शकतात त्यांना काय त्रास होतोय ते, परंतु मुलांना सांगता येणार नाही,
मुलं खुशीमध्येही रडतात आणि कारण नसतांनाही रडतात .
तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांनी सतर्क राहून आपलं काम नेटानं करावं. ज्या आदिवासी गावात शून्य लसीकरण आहे.
तिथे जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. आदिवासीं लोकांचा विश्वास असणारे त्यांचे वैदू, पुजारी, महाजन, पाटील यांच्यामार्फत लोकांना महत्व सांगून लसीकरण करून घ्यावे.
कॉफी विथ मी - सीईओ वर्षा ठाकूर- घुगे
याप्रसंगी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे म्हणाल्या, आपल्या तालुक्यात प्रामाणीकपणे, वेगाने काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसारखं इतरांनीही काम करावे व
आपलं लक्ष गाठावं. जे सर्वात लवकर 100 टक्के काम पूर्ण करतील त्यांचा आम्ही सत्कार करणार व त्यांना नांदेडला
आमच्या कॅबिनला बोलावून त्यांचेसमवेत आम्ही कॉफी घेऊ. आदिवासी पाड्या- गुड्यात गोंडी,
कोलामी बोलणाऱ्या शिक्षकांना पाठवून त्यांच्या भाषेत जनजागृती करावी.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. कार्तिकेयन यांनीही मनोगत व्यक्त केले.
63 टक्के लसीकरण केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र अप्पारावपेठचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवि मंडगीकर,
46 टक्के लसीकरणासाठी दहेलीचे डॉ. संदीप जाधव,
कोरानामुक्त गाव केल्याबद्दल इस्लापूरचे डॉ. के. पी. गायकवाड व शिवणीचे डॉ. कानीफनाथ मुंडे,
कोरोना जनजागृती व मिडीया कक्षाचे प्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्तम कनिंदे, गायक सुरेश पाटील, ढोलकी वादक साहेबराव वाढवे यांचा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे,
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. कार्तिकेयन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.