2 नोव्हेंबर रोजी किनवट तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार " विशेष लसीकरण मोहिम
-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार
किनवट : जास्त लसीकरण झालेल्या गावात 100 टक्के व कमी लसीकरण झालेल्या
गावात उदिष्टपूर्ती करणे या हेतूने मंगळवार ( दि. 2 नोव्हेंबर ) रोजी तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार"
विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, तेव्हा ग्रामपातळीवरील सर्व ग्रामनायक, अधिकारी, कर्मचारी
यांनी स्वयंस्फूर्तीने जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे व लाभार्थींनीही पुढं येऊन लस टोचून घ्यावी,
असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध उपक्रम राबवून जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का वाढविण्याचा चंग बाधला आहे.
यानुषंगाने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव व गट विकास अधिकारी सुभाष धनवे
यांच्या नेतृत्वात तालुक्यात 'मिशन 10 हजार' ही विशेष लसीकरण मोहिम 100 गावात राबविण्यात येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बाल विकास प्रकल्पाधिकारी आश्विनी ठकरोड
यांनी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. उत्तम धुमाळे व डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांच्या सहकार्याने ही मोहिम फत्ते करण्याठी आखणी केली आहे.
मंगळवार (दि. 2 नोव्हेंबर ) रोजी जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी हे तालुक्यातील लसीकरण केंद्रास भेट देऊन पूर्णवेळ थांबून पाहणी करणार आहेत . तेव्हा
या मोहिमेत वैद्यकीय विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलिस पाटील,
सरपंच आदि ग्रामस्तरावरील सर्वांनी लसीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी सेवाभावी वृत्तीने स्वतःला झोकून देऊन काम करावे व लाभार्थींनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले आहे. असे मिडिया व जनजागृती कक्षाचे उत्तम कानिंदे यांनी कळविले आहे.