जराराम संतोष तुप्पलवार या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
किनवट : मंगळवार (दि.5) रोजी दुपारी 4 वाजता येथील शांतीभूमी परिसर लगतच्या लोहमार्ग पुलाच्या
पूर्वेकडील डोहात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळेत इयत्ता नववीत शिकणारा
जराराम संतोष तुप्पलवार (वय 15 वर्षे ) व विनायक संतोष तुप्पलवार (वय 17 वर्षे)
हे दोघे भाऊ मंगळवार (दि.5) रोजी दुपारी पावनेचारच्या सुमारास शांतीभूमी परिसर लगतच्या लोहमार्ग पुलाच्या पूर्वेकडील नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उतरले.
त्यांना तिथे खोल डोह आहे याचा अंदाज आला नव्हता.
तसेच जराराम संतोष तुप्पलवार यास पोहता येत नव्हते. त्यामुळे तो डोहातून बाहेर आलाच नाही.
तेव्हा त्याचा मोठा भाऊ विनायक संतोष तुप्पलवार याने आरडाओरड केली.
तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संदेश दिला.
पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलिस नायक गजानन चौधरी घटनास्थळी दाखल झाले.
रेल्वे पुलावर बसलेल्या दोघांनी जयरामचा देह पाण्यात बुडालेल्या अवस्थेतून बाहेर काढला. पोहेकाँ राठोड
यांनी घटनास्थळाचा पंचानामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय,
गोकुंदा येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिस अधिक तपास करीत आहेत.
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात पतिच्या आकस्मिक निधनानंतर अनुकंपा धर्तीवर सेविका म्हणून कार्यरत असलेल्या
श्रीमती सागर संतोष तुप्पलवार ह्या जयराम व विनायक या दोन लेकराला घेऊन सुभाषनगर येथे राहतात.
18 महिन्याच्या कालावधीनंतर सोमवार (दि.4) रोजी शाळारंभ झाल्याने त्यांनी आपल्या लेकरांना शाळेत पाठविले होते.
तसेच संगणक व टायपिंग प्रशिक्षणासाठी एका संस्थेत प्रवेश दिला होता.
हे दोन्ही भावंडं मंगळवार (दि.5) रोजी ह्या प्रशिक्षणाला न जाता दुपारी साडेतीन ते पावने चारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले होते.