सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या प्रत्यक्ष भेटीने शिवरामखेड्यातील 70 टक्के आदिवासींनी घेतली लस
किनवट : "मिशन कवचकुंडल" अंतर्गत विशेष लसीकरण मोहिमेत तालुक्यातील
अतिदुर्गम शिवराम खेडा गावात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार
यांनी प्रत्यक्ष जाऊन लसीकरणाची भीती दूर केल्याने गावातील 70 टक्के आदिवासिंनी कोविडची लस घेतली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतील
"मिशन कवचकुंडल " अंतर्गत तालुक्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने किनवट तालुक्यातील पाड्या- गुड्या, वाडी-तांड्यावर कोरोना जनजागृती करण्यात आली होती.
तरिही डोंगर कपारीत राहणाऱ्या अतिदुर्गम पाड्यातील आदिम कोलाम समाज हा लसी घेण्यापासून थोडा अलिप्त होता. तेव्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून
या अतिमागास आदिम जमातीसह इतर सर्व आदिवासींच्या सर्वांगीण उत्थानासाठी कार्य करणारे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पूजार
यांनी शिवरामखेडा या अतिदूर्गम गावास प्रत्यक्ष भेट देऊन
सर्वांना लसीचे महत्व पटवून दिले व कोणीतीही भिती न बाळगता लस घेण्याचे आवाहन केले.
त्यामुळे गावातील 192 पैकी 134 लाभार्थ्यांनी लस टोचून घेतल्या.
यावेळी सरपंच प्रेमसिंग राठोड, स्मिता पहुरकर,पाटील गुलाब मडावी व विजय मडावी उपस्थित होते.
आरोग्य सेविका वैशाली सुरकुटवार व आरोग्य सेवक आशीर्वाद दिसावर यांनी लस टोचल्या. मुख्याध्यापक दिलीप राठोड,
सहशिक्षक मधुकर पोतकंटवार, अंगणवाडी सेविका अनिता मेश्राम, मदतनीस सुरेखा नैताम, आशा वर्कर पुष्पा राठोड,
ग्रामसेवक कागणे व स्वस्त धान्य दुकानदार किशन मडावी यांनी या आदिवासी पोडातील लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.