आई निंदतांना झाडाखाली बसून अभ्यास करणाऱ्या आदिवासी लेकीचा गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केला सन्मान
किनवट : आई शेतात निंदन करीत आहे . . . मुलगी सागाच्या झाडाखाली बसून अभ्यास करतेय .
हे दृश्य पाहुन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने चिखल माती तुडवत पोहचले शेतात अन् त्यांनी केला आयुष्याच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकीचा सन्मान .
शाळारंभाच्या पहिल्याच दिवशी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने हे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर,
किशन भोयर व उत्तम कानिंदे याचे समवेत केंद्रिय प्राथमिक शाळा कमठाला व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी या दोन शाळांना भेटी देऊन परत येत होते.
तेव्हा रस्त्यात एका शेताकडे त्यांचं लक्ष गेलं. शेतात आई निंदते आहे
तर तिची मुलगी झाडाखाली बसून अभ्यास करते आहे. तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थिनीचं स्वागत करायचं ठरवलं.
मग सर्वजन पोहचले थेट शेतात. मक्याच्या शेतात आलेली जनावरे हाकून तिचे वडील ही तिथे आले होते.
त्यांना बोलतं केलं. तेव्हा कळलं की,
गोडवडसा जवळील आदिवासी पाड्याचे रहिवाशी रामेश्वर मेश्राम हे सालगडी म्हणून किनवटच्या शिवारातील एका शेतात राबतात.
पत्नी वनमाला निंदन खुरपण करते, एक मुलगा पदवीचे शिक्षण घेतोय तर दूसरी मुलगी भावना ( हीच अभास करणारी )
सरस्वती विद्या मंदीर उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता बारावी (विज्ञान) शाखेत शिकते. सोमवार (दि .4 ) शाळारंभाचा दिवस असल्याने शाळेत जाऊन आली.
आई निंदत आहे अन् ही भावना अभ्यास करून आपलं भवितव्य गोंदत आहे.असं आशादायी चित्र दिसलं.
याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी तिला सांगितलं, "सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार
यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना ठाक्टर बनविण्यासाठी आरसीसी क्लासच्या सहयोगातून "निट मिशन 2022 " हा नाविण्य पूर्ण उपक्रम आखला आहे.
याची प्रवेश परीक्षा मंगळवार (दि.5) रोजी आहे. तू या परिक्षेला उपस्थित रहा ". हे ऐकून ती आनंदली,
मी सुद्धा डॉक्टर बनू शकते, तिचा आत्मविश्वास बळावला. तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
हे सांगेपर्यंत तिला माहित सुद्धा नव्हत, आपल्यासाठी अशी परिक्षेची उपलब्धी आहे.
असेच एकेक हिरे शोधून तालुक्यातून भविष्यात शंभर आय.ए. एस. निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे.