सलग 72 तास लसीकरण मोहीमे प्रमुख अधिकार्यांसह ते ग्रामपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (आएएस)
किनवट : तालुक्यात कोरोना /ओमीक्रोन विषाणुमुळे बाधित रुग्णसंखेत दैनंदिन वाढ होत आहे.
याचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात दि. 17 ते 19 जानेवारी रोजी सलग 72 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
यासाठी कार्यालय प्रमुख अधिकार्यांपासून ते ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच पुढाकार घ्यावा ,
असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार ( आएएस) यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, 15 ते 18 वयोगटातील लसीकरण , पहिला डोस या सह दुसऱ्या डोस कडे विशेष फोकस करून तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्र ,
60 उप केंद्रांतर्गत 230 गावात सोमवार (दि.17) ते बुधवार (दि.19) यादरम्यान सलग 72 तास विशेष लसीकरण मोहीम आखली आहे.
याकरिता गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवून प्रत्येक गावात सरपंच,
ग्राम पंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक व गावपातळी वरील सर्व अधिकारी - कर्मचारी यांची बैठक घेऊन,
दवंडी देऊन व ध्वनीक्षेपकाद्वारे घरोघरी सूचना करून सर्वांना लस घेण्यास प्रवृत्त करून लसीकरण केंद्रात आणावे.
तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आपल्या अधिनस्त सर्व मंडळ अधिकारी व तलाठी
यांना गावपातळीवर राशन दुकानदार, सेतु केंद्र , बँकेचे व्यवस्थापक
यांच्या मार्फत लाभार्थींना लस घेण्यास प्रवृत्त करण्यास सूचवावे व दररोजचा अहवाल घ्यावा.
गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांनी आपल्या अधिनस्त शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर
यांना गावातील घर घर जाऊन जनजागृती करून लाभार्थीस लस केंद्रात आणण्याची व्यवस्था करावी.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दररोज दुरचित्रवाणी बैठकीची व्यवस्था करावी.
तंत्रस्नेही शिक्षकांमार्फत दररोजच्या नोंदी ऑनलाईन कराव्या. तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी ,
समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचेकडून दररोज कार्याचा आढावा घ्यावा.
इतर सर्व कार्यालय प्रमुखांनी आपापल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना
या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी करून जास्तीत जास्त लसीकरणासाठी कार्यरत सर्व पथकांना सहकार्य करावे.
असेही श्री पुजार यांनी सांगितले.