Ticker

6/recent/ticker-posts

रामस्वरूप मडावी यांनी 'काहूर' काव्यसंग्रहात आदिवासींच्या भाकरीचा संघर्ष रेखाटला -प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अभियंता विवेक मवाडे किनवट : मराठी साहित्यात विविध साहित्य प्रवाह आपली कैफियत मांडत पुढे आले आहेत


रामस्वरूप मडावी यांनी 'काहूर' काव्यसंग्रहात आदिवासींच्या भाकरीचा संघर्ष रेखाटला  
-प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अभियंता  विवेक मवाडे 
किनवट :  मराठी साहित्यात विविध साहित्य प्रवाह आपली कैफियत मांडत पुढे आले आहेत. 

आंबेडकरवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, जनवादी, स्त्रीवादी, श्रमिकांचे साहित्य असे विविध साहित्य प्रकार आपल्या समस्या,  विधानांना मांडण्यासाठी निर्माण झाले आहेत.

 यामुळेच विद्रोह आणि हक्काची भाषा ही साहित्यातून उमटते. रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहातून जीवनाच्या व समाज व्यवस्थेच्या विविध अंगांना साकारलं आहे. 

दुःख , दैन्य , दारिद्र्य व अज्ञान यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींच्या हातावर मीठ भाकरी  भेटणं मुश्कील असतं. 

ह्याच भाकरीचा संघर्ष  त्यांनी आपल्या  काव्यसंग्रहातून रेखाटला आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, नामांतर शहीद पुत्र तथा महावितरण नाशिकचे उप कार्यकारी अभियंता डॉ. विवेक मवाडे यांनी केले. 
           

येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल मधील संत तुकाराम महाराज सभागृहात रामस्वरूप लक्ष्‍मण मडावी यांच्या 'काहूर' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

 यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर, 

महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऍड. मुकुंदराज पाटील, मुख्याध्यापक मोहन जाधव, निवृत्त पोस्ट मास्तर दौलतराव कोवे व कवि रामस्वरूप मडावी, पुष्पा मडावी हे  मंचावर उपस्थित होते. 
     
  प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. 

प्रारंभी महानायकांच्या प्रतिमा पूजनानंतर वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी स्वागत गीत गाईले. 
        
याप्रसंगी बोलतांना तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर म्हणाले की, आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. 

अभ्यासून तो आपल्या पिढीसमोर आपण आणला पाहिजे. तसेच आपलं दुःख , वेदना व  समस्या साहित्यातून समाजासमोर आल्या पाहिजेत. 

म्हणूनच रामस्वरूप मडावी यांचा 'काहूर ' हा काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. 
    
  यावेळी ऍड . मुकूंदराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. किशन धुर्वे यांनी गोंडी भाषेत विद्रोही कविता सादर केली. 

अध्यक्षीय समारोप करतांना गट शिक्षणाधिकारी महामुने म्हणाले की, कविता शिकवितांना रामस्वरूप मडावी यांनीच साहित्य निर्मिती केली. 

अशा धडपडणाऱ्या सर्व शिक्षकांचं साहित्य आम्ही तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोहचवू. आदिम इतिहास ताजा करणाऱ्या त्यांच्या लेखनीस सलाम.
      

  कार्यक्रमास गोरबंजारा साहित्यिक प्रा. डाॅ. वसंत राठोड, केंद्रप्रमुख  रामा उईके, विजय मडावी, शिवाजी खुडे, सुभाष बोड्डेवार, देविदास वंजारे, जगदीश कोमरवार, साई नेम्माणीवार, राजा तामगाडगे, राजेश पाटील, विकास कोवे, वर्षाराणी कोवे उपस्थित होते.
        

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल येरेकार, समशेर खान, रुपेश मुनेश्वर, नवनाथ कोरनुळे, रमेश राठोड, प्रदीप कुडमेते, राहूल तामगाडगे, दीपाली मडावी, ओमकार मडावी आदिंनी परिश्रम घेतले.