महिला व बालक 9151 लाभार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी महिला बालकल्याण विभागाने राबविली यशस्वी मोहीम
किनवट : तालुक्यातील अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर महिला 9151 लाभार्थ्यांची पोषण ट्रॅकर ऑप्लिकेशनवर आधार कार्ड नोंदणीसाठी महिला बालकल्याण विभागामार्फत यशस्वीपणे मोहिम राबविण्यात आली.
याअनुषंगाने बालकांना पुरक पोषक आहार दिला जातो. या शिवाय अंगणवाडीमार्फत गावातील गरोदर स्तनदा मातांनाही पोषण आहार वाटप केला जातो.
त्यासाठी आता पोषण ट्रॅकरवर आधार नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानुसार किनवट शहरात, परिसरात व तालुक्यात आधार कार्ड काढणे व नोंदणीचे काम करण्यात आले.
तालुक्यासह परिसरात सुमारे 9 हजार 151 लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम युध्दपातळीवर मोहिमेच्या स्वरूपात हाती घेण्याचा निर्णय बालकल्याण विभागाने घेतला होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड
यांच्या उपस्थितीत तातडीने पर्यवेक्षिका यांची बैठक घेऊन पंधरा दिवसात सर्व लाभार्थ्याची नोंदणी करण्याचे नियोजन केले होते.
आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्यात उपलब्ध असलेल्या किट नुसार प्रत्येक दिवशी अंगणवाडीनिहाय नियोजन करण्यात आले.
१ ते १५ जुलै दरम्यान ही मोहिम राबवून सर्व लाभार्थ्यांची आधार नोंदणी केली. या संदर्भात विजेची अडचण येऊ नाही म्हणून महावितरण कंपनीला पत्र देण्यात आले होते.
ज्या ठिकाणी आधार नोंदणी व आधार कार्ड काढण्याचे काम सुरू असेल त्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती.
शहरातील राजमाता जिजाऊ चौकात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ केला होता.
यावेळी गट विकास अधिकारी सुभाष धनवे व महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा विस्तार अधिकारी सुधीर सोनवणे उपस्थित होते.
चौकट
"तालुक्यातील संपूर्ण परिसरात अंगणवाडी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात नियोजनाची माहिती दिली होती. अंगणवाडीतील बालकांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांना अंगणवाडीत आणुन त्या ठिकाणी आधार कार्ड काढून घ्यावेत,
त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. शासनाने आता अंगणवाडीतील सर्व व्यवहाराला पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
अंगणवाडीतून जे काही मिळणार आहे, ते थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठीच बालकांची आधार नोंदणी आवश्यक आहे.