किनवट/प्रतिनिधी - किनवट व तालुक्यामध्ये गावठाण प्रमाणपत्राच्या रॅकेटच्या भस्मासुराने उच्छाद मांडला आहे. केवळ या एका प्रमाणपत्राच्या आधारावर भूखंड माफीयांनी आज तगायत कोट्यावधी रुपयाच्या शासकीय जमिनी गिळंकृत केले आहेत.
हे केवळ माफीयांकडून शक्य होत नसून याला प्रशासनातील शुक्राचार्य ही सामील असल्याने सदर प्रकरणी अनेक तक्रारी असताना कार्यवाही शून्य आहे.
तर या प्रकारामुळे सर्वसामान्य गंडवला जात असून शासनालाही महसूल रूपाने मोठे नुकसान होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट शहरासह तालुक्यातील इस्लापूर, शिवानी, बोधडी, कोठारी (चि.), गोकुंदा, घोटी, अंबाडी, मांडवी, उमरी (बा.), सरखणी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे.
त्यामुळे रहिवाशी विस्तारही वाढत आहे त्याकरिता जवळपासच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग करून विक्री करणारे भूखंड माफिया सक्रिय आहेत.
शहरालगतच्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर विल्हेवाट लावण्यात येत आहे यामध्ये भगवटदार वर्ग २, गायरान, पांदण रस्ते यांचाही समावेश आहे.
तर गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील निजामकालीन तलावही नाहीसे होऊन त्यावर नागरी वस्ती झाली असून या जमिनीचीही गावठाण प्रमाणपत्राच्या आधारावर दस्त नोंदणी सर्रास होत आहे. अर्थातच यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे
अशा आशयाच्या अनेक तक्रारी स्थानिक संबंधित कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात असून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने यामध्ये प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी
यांची संलिप्तता स्पष्ट आहे तर राजकारणातील बडे प्रस्थ यामध्ये सामील असल्याने प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर दबावही आहे
नियमबाह्य गावठाण प्रमाणपत्र आधारे होणारी दस्त नोंदणी रोखल्यानंतरही काही पक्षाचे पदाधिकारी यांच्या निवेदनानंतर
असे बोगस प्रमाणपत्र वैद धरण्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांनी अशी दस्त नोंदणी पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.
यामध्ये मोठ्या रॅकेटचा हात असल्याने प्रशासनावर आर्थिक हितसंबंध शिवाय राजकीय दबावही काम करत असल्याचे याबाबत प्राप्त निवेदना मधून स्पष्ट होते अशा बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत
ज्यामध्ये शासकीय महसूल बुडत असून शासकीय जमिनी ही गिळंकृत होऊन अशा जमिनीची खरेदी विक्री दस्त नोंदणी द्वारे होत असल्याने सर्वसामान्य खरेदीदाराची फजगत होत आहे.
याबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असून यामध्ये आर्थिक आमिषाला बळी पडून गावठाण प्रमाणपत्र निर्गमित करणारे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी
दुय्यम निबंधक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होणे आवश्यक असून सदर गंभीर बाबीवरून सामाजिक कार्यकर्ते जगदिश सामनपेल्लीवार हे लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समजते