Ticker

6/recent/ticker-posts

आ. राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला यशकिनवट तालुक्यात स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून आरोग्यमंत्र्याकडून मान्यता


आ. राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला यश

किनवट तालुक्यात स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून आरोग्यमंत्र्याकडून मान्यता

(नांदेड प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील किनवट हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिले.

महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे प्रतोद, आ. राजेशभाऊ राठोड यांनी किनवट या बंजारा, आदिवासी बहुल तालुक्यातील महिला व वृद्ध नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या बघता यासंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

आरोग्यमंत्री म्हणाले की, गोकुंदा हे गाव किनवट पासून चार किमी अंतरावर आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी लोकसंख्येचा असणारा निकष पूर्ण होत नसल्याने हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. तथापि किनवट हा दुर्गम, आदिवासी भाग असल्याने येथे स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहाला आश्वासन दिले आहे.

किनवट तालुक्यामध्ये स्वतंत्र स्त्री रुग्णालय व गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून आमदार राजेशभाऊ राठोड यांचे आभार मानण्यात येत आहेत.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सन्माननीय विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला