किनवटच्या रेल्वे स्थानकाचे लवकरच अत्याधुनिकरण होणार
खासदार हेमंत पाटील; अमृत भारत योजनेत किनवट रेल्वे स्थानकाचा समावेश
किनवट, दि.३ (प्रतिनिधी) ः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेच्या देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक ’ योजना सुरू केली आहे.
या माध्यमातून भारतीय रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, यात महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा तर नांदेड विभागातील डझनहून अधिक स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात किनवटचा समावेश करण्यात आला आहे.
लवकरच किनवट रेल्वे स्थानकाचा कायापालट होईल आणि किनवटकरांना रेल्वेकडून दर्जेदार व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
‘अमृत भारत स्थानक’ योजने संदर्भात अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा शाश्वत विकास करणे अपेक्षित आहे.
यामध्ये स्थानकांवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्यांची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे,
स्थानकावरील सुविधा सुधारणे, फिरणारे क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट, एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क.
प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन 'एक स्टेशन एक उत्पादन' योजनांद्वारे उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित जागा,
लँडस्केपिंग , इमारतीत सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय,
बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, 'रूफ प्लाझा आवश्यकतेनुसार, टप्याटप्याने व्यवहार्यता आणि स्टेशनवर दीर्घकालीन सिटी सेन्टर्स निर्माण करणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याभागातील अधिकाधिक लोक वाडी, वस्ती आणि तांड्यावर राहतात.
विशेष म्हणजे किनवट तालुका जिल्ह्यापासून चार तासाच्या अंतरावर आहे. याकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्टेशन’ ही अभिनव योजना हाती घेतली
यात किनवटच्या रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला ही माझ्यासह किनवटच्या रहिवाशांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.