नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा 'आक्रोश मूक मोर्चा'!
शासनाद्वारे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण आखले जात आहे की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून लवकर कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही.
शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत शासन उदासीन असल्याची भावना शिक्षकांत निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणाऱ्या सर्व शिक्षक संघटना, समन्वय समिती नांदेड यांच्याकडून आज कलामंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत २५ सप्टेंबर रोजी आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला.
दि.१५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. डी एड-बी एड बेरोजगारांचे कारण पुढे करून, १० व १० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षक कंत्राटी धोरण राबवून शासनाने शिक्षणाची खिल्ली उडवली आहे. अप्रत्यक्षपणे शिक्षकांबाबत वेठबिगारीचे धोरण अवलंबले आहे. हे कंत्राटी धोरण रद्द झाले पाहीजे अशैक्षणिक कामे कमी करावे. दि. १ नोव्हेंबर २००५ व तद्नंतर सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना १९८२ सालची जुनी पेन्शन योजना लागू करावी. मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा. आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा. कैशलेश आरोग्य योजना लागू करा. सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावा. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके पुरवावीत. पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत.. अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्य बाबतचा शासन निर्णय रद्द करावा. शालेय पोषण योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करावी.
इत्यादी प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या आक्रोश मूक मोर्चात नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
मधुकर उन्हाळे प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघ